खरीपासाठी खत - बियाणे टंचाई होऊ देणार नाही : आमदार विलास भुमरे

Foto
पैठण, (प्रतिनिधी): खरीब हंगामाच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा कोणताही तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, व्यापाऱ्यांनी खताचा साठा करू नये खत, बी, बियाणे साठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशा स्पष्ट सूचना आमदार विलास भुमरे यांनी दिल्या. पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामाची नियोजन आढावा बैठक आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी तहसीलदार ज्योती पवार, उपविभागीय कृषी अधिकारी अश्विनी पठारे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, सभापती वैशाली विनोद बोंबले, उपसभापती संजय लघाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार भुमरे म्हणाले की, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. कृषी अधिकारी गावपातळीवर जात नसल्याच्या तक्रारी गंभीर असून संबंधितांविरोधात कारवाईचा प्रस्ताव सादर करावा. बालानगर, आपेगाव आणि आडुळ येथील कृषी सहाय्यकांविरोधात निलंबनाचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
-- तालुक्यासाठी सुमारे ४० हजार टन खतसाठा मंजूर -- 
बैठकीत कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यासाठी सुमारे ४० हजार टन खतसाठा मंजूर असून युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे १.३१ लाख हेक्टर असून त्यापैकी ८१ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यंदा तुरीच्या लागवडीत वाढ होऊन ती सुमारे २३ हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर ज्वारीचा पेरा कमी राहण्याची शक्यता आहे.

-- तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश -- 
खत टंचाई टाळण्यासाठी शेतकरी, खत विक्रेते आणि अधिकारी यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर माहिती व मार्गदर्शन देण्यावर भर दिला. उसाचे क्षेत्र वाढत असताना खतांची कमतरता भासत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

-- उशिरा पाऊस झाल्यास पर्यायी पिकांचा अवलंब करावा -- 

पावसाच्या आगमनानुसार पिकपद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत, उशिरा पाऊस झाल्यास पर्यायी पिकांचा अवलंब करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी यावेळी केले. 

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य कृष्णा गिधाने, दिलीप जगताप, पांडुरंग औटे, नितीन तांबे, पंचायत समिती सदस्य दादा गलांडे, मनोज गायके, भरत मुकूटमल, प्रियंका भुजंग, सखुबाई झारगड, सहायक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, भुषण कावसानकर, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, सतिष अंधाळे, कहार समाज संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ इछैय्या, डी. डी. जाधव, उमेश तट्टू, शेखर शिंदे, अनिकेत धारकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.